वसई(पालघर)-वसई येथे एका कारचालकाने कार थांबवल्याच्या रागातून वाहतूक पोलिसाला मारहाण केली आहे. ही घटना बुधवारी घडली असून याप्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
दिनेश म्हात्रे हे बुधवारी अर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहतूक नियंत्रणाचे काम करत होते. त्यावेळी येथील परिसरात फेरफटका मारण्यासाठी आलेल्या चारचाकी वाहनाला म्हात्रे यांनी थांबविले. म्हात्रे यांनी त्या गाडीची तपासणी देखील केली. मात्र, तपासणी सुरू असताना कारचालकाने या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरवात केली. घटनास्थळावर असलेल्या स्थानिकांनी पोलिसाला मारहाण करण्यापासून कारचालकाला मज्जाव केला.
या कारचालकास तत्काळ अर्नाळा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दिनेश म्हात्रे यांच्या तक्रारीनंतर अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी सांगितले