पालघर - जव्हार बस आगारातील एका वाहकाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. दीपक खोरगडे (वय 30) असे या वाहकाचे नाव असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू
गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची आग्रही मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. दिवाळीपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून अद्यापही संपावर तोडगा काढण्यात आलेला नाही. जव्हार बस आगारातील वाहक दीपक खोरगडे (वय वर्षे 30)या बस कंडक्टर (वाहक) याने शनिवारी सायंकाळच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या वाहकाला जव्हार कुटीर रूग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली.
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वाहकाचा आत्महत्येचा प्रयत्न
एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण होणार नाही असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले असून सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. जोपर्यंत समितीचा अहवाल येत नाही तोवर कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही असं सांगण्यात आले आहे. हे ऐकताच मानसिक स्थिती बिघडल्याने आत्महत्याचा प्रयत्न केला, असा जबाब आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वाहकाने जव्हार पोलिसांना दिला आहे.
हेही वाचा - नक्षलवाद्यांचा देशातील सर्वात मोठा नेता मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा