पालघर - जिल्ह्यातील मनोर ग्रामीण रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचा सहकारी असलेला परिविक्षाधीन वैद्यकीय अधिकारी हे एका अपघाती निधन झालेल्या मृत व्यक्तीच्या शविच्छेदन अहवाल घेण्यासाठी तक्रारदार व्यक्तीकडून 5 हजाराची लाच मागितली यावर 4 हजार रुपयांची लाच घेताना ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. या लाचप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. सदर प्रकरणी गरीब जनतेची लूट करणारे असे लाचखोर अधिकारी हे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावेत असे आवाहन भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी समाज माध्यमांवर व्हायरल केलेल्या व्हिडिओत केले आहे.
पालघर जिल्ह्यातील मनोर ग्रामीण रुग्णालयामधील आरोपी वैद्यकीय अधिकारी याने अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीच्या मुलाकडून शविच्छेदन रिपोर्ट घेण्यासाठी 5 हजाराची लाच मागितली होती. तक्रारदाराने 22 जानेवारी 2021 रोजी लेखी तक्रार केली.22 जानेवारी ते 25 जानेवारी 2021 च्या कालावधीत आरोपी वैद्यकीय अधिकारी याने सदर रक्कम दुसऱ्या परिविक्षाधीन आरोपी यांच्याकडे देण्यास ठरल्याने अखेर 4 हजाराची लाच रक्कम ही 25 जानेवारी रोजी सायंकाळी पाच सुमारास स्वीकारताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले आहे. स्वप्निल व पांडे अशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावे आहेत.
गोरगरीब आदिवासी जनतेला लुटणारे लाचखोर अधिकारी पालघर जिल्ह्यातून हद्दपार करा -
या प्रकरणी दोन जणांना सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याने भाजप जिल्हा सरचिटणीस यांनी असे लाचखोर अधिकारी पालघर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावेत, यासाठी पुढाकार घ्यायला हवा आणि ही कारवाई करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केला आहे. लाचप्रकरणी कारवाई पोलीस निरीक्षक भारत साळुंखे व त्यांचे सहकारी यांनी केली आहे.