पालघर - नालासोपारा विधानसभा मतदारसंघासाठी बहुजन विकास आघाडीतर्फे आमदार क्षितीज ठाकूर, आमदार हितेंद्र ठाकूर व प्रविणा ठाकूर यांनी, तर शिवसेनेकडून माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. यावेळी दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
नालासोपारा विधानसभेसाठी शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी गुरूवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 'जनतेचा उत्साह पाहता नक्की या जनतेला बदल हवा आहे, हे दिसून येत आहे. तीस वर्षांपासून जे प्रशासन येथे आहे, त्याला लोक कंटाळले आहेत त्यांना पर्याय हवा होता, आणि तो पर्याय म्हणून जनतेने मला निवडले आहे. छत्तीस वर्षे मी पोलीस खात्यात नोकरी केली, मात्र आता माझी दुसरी इनिंग सुरू होत आहे. त्यासाठी मी भरपूर मेहनत करेल, जनतेची सेवा करेल आणि जनतेत मिळून-मिसळून राहील,' असे प्रदीप शर्मा यांनी यावेळी म्हटले.
हेही वाचा... भाजपची चौथी यादी जाहीर; खडसे, तावडे, मेहता, पुरोहित यांना डच्चू
'आम्ही उमेदवारी अर्ज भरण्यास आलो आहोत. माझ्यासोबत आलेली जनता स्वतःहून आली असून याला फक्त शक्तीप्रदर्शन म्हणता येणार नाही तर ही विजयाची मिरवणूकच आहे, असेच मला वाटते,' असे क्षितीज ठाकूर यावेळी म्हणाले. तसेच 'स्वतःच रॅलीमध्ये गुंड घेऊन फिरत, इतरांना वसई विरारमध्ये गुंडगिरी करत असल्याचे बोलणाऱ्यांनी नक्की दहशत म्हणजे काय, याचा अर्थ आम्हाला सांगावा' असे बोलत क्षितिज ठाकूर यांनी प्रदीप शर्मा यांना टोला मारला आहे.
नालासोपारा येथे शिवसेनेकडून पूर्व सेंट्रल पार्क ते श्रीप्रस्थ येथील निवडणूक कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. या दरम्यान नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तब्बल एक तास येथे वाहतूक कोंडी होती. तर दुसरीकडे क्षितीज ठाकूर यांची रॅली नालासोपारा पूर्वेकडून श्रीप्रस्थ निवडणूक कार्यालयापर्यंत काढण्यात आली होती.
हेही वाचा... पालघरमध्ये भाजपच्या दोन गटात राडा; नवरात्रोत्सवाच्या भर स्टेजवर झाली झटापट