पालघर - जिल्ह्यात एकूण 6 विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक 3 आमदारांचे प्राबल्य असलेल्या बहुजन विकास आघाडीने महाविकासआघाडी सोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी पक्षाचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या दोन आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट घेत, महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शवला आहे.
हेही वाचा- खासगीकरणाची प्रक्रिया अयशस्वी ठरली तर एअर इंडिया बंद होणार
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाने विविध घटक पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी स्थापन केली. त्यात बहुजन विकास आघाडी देखील या महाआघाडीत सामील झाली. जिल्ह्यात सेना-भाजप युतीला बहुजन विकास आघाडीने कडवी झुंज दिली. जिल्ह्यातील एकूण सहापैकी वसई नालासोपारा आणि बोईसर या तीन जागा जिंकल्या. मात्र, निवडणूक निकालानंतर भाजप हा राज्यातील मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने ते भाजपला पाठिंबा देणार अशा अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर महाराष्ट्राची राजकीय परिस्थितीही बदलली. महाविकासआघाडीचे सरकार येणार असे स्पष्ट झाले. मात्र, निवडणूक निकालापासून बहुजन विकास आघाडी कोणासोबत जाणार याबाबत पक्षश्रेष्ठींनी मौन बाळगले होते.
नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधी सोहळ्याच्या वेळी बुधवारी बहुजन विकास आघाडच्या तिन्ही आमदारांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकासआघाडी सोबत राहण्याचा निर्णय घेतला. बुधवारी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासह नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर आणि बोईसरचे आमदार राजेश पाटील या तिघांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यामुळे बहुजन विकास आघाडी भाजपसोबत असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आमचा पक्ष महाआघाडीचाच घटक पक्ष होता. त्यामुळे नव्याने पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही पूर्वीपासून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत होतो. पुढेही राहू, असे बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले आहे.