पालघर Bahadoli Plums Gets GI Tag : बहाडोली गावात (Bahadoli village) 1875 साली बाळा जोशी यांनी जांभळाची (Black Plum) लागवड केली होती. जांभळाची चव आवडल्याने तिथल्या शेतकऱ्यांनी बांधावर बिया लावल्या होत्या. आज या जांभळाला वेगळी ओळख जीआय मानांकनामुळे मिळाली आहे. या जांभळाची चव ही अप्रतिम असल्याने त्यास मुंबई आणि आजूबाजूच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सन 2004 साली तत्कालीन जिल्हाकृषी अधिकारी ठाणे यांनी गावात जांभूळ महोत्सवाचे (Jambhul Mahotsav) आयोजन करून इथल्या जाभळांना राज्यामध्ये बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता.
एका झाडापासून एकशे वीस किलो फळे : बहाडोली गावाचा भौगोलिक क्षेत्र 297.97 हेक्टर असून खातेदार संख्या १८४ आहे. या फळांचे सरासरी वजन 23.4 ग्राम असते. यामध्ये गराचे प्रमाण 87 टक्के आहे. फळाचा रंग गडद जांभळा असून परिपक्व फळे चार दिवसापर्यंत टिकतात. या फळाचे योग्यरित्या ब्रँडिंग व्हावे या उद्देशाने कृषी विभागाने 'विकेल ते पिकेल' या संकल्पनेतून शेतकऱ्यांना आकर्षक पॅकिंगचे नियोजन करून दिले. एका झाडापासून शंभर ते एकशे वीस किलो फळे मिळतात. एकूण 142 जांभूळ उत्पादन शेतकरी असून 55 हेक्टरमध्ये जांभळाची झाडे आहेत. 3 हजार 551 झाडे असून 14.85 हेक्टर क्षेत्रावर नवीन जांभळाच्या झाडाची लागवड करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता वाढेल : जिल्ह्याचे वैशिष्ट्य असलेली बहाडोलीची जांभळ ही वेगळ्या भूभागावर येणाऱ्या जांभळापेक्षा वेगळी आहेत. याला एक वेगळी चव आहे. त्याच्या रंगात पण वेगळेपण आहे. ते ग्रेड 'ए' प्लस वर्गात मोडते. जीआय मानांकनासाठी प्रस्ताव टाकण्यात आला होता, त्याला मान्यता मिळाली आहे. उत्पादन मूल्यवर्धन होऊन भविष्यात इथे व्यवसायिक येण्याची शक्यता आहे. लागवडीचे क्षेत्र वाढेल, पुढे निर्यात सुद्धा होईल. तसेच दुपटीचा भाव मिळेल जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता वाढेल असे, जिल्हा कृषी अधिकारी निलेश बागेश्वर यांनी सांगितलं.
काय आहे जीआय मानांकन : हे मानांकन त्या विशिष्ट परिसरातील मूळ कृषीविषयक, नैसर्गिक किंवा उत्पादित माल ओळखण्यासाठी वापरतात. या मालाचा उगम त्या विशिष्ट प्रदेशातीलच असतो. जीआय मानांकन हे एखादी वस्तू, पदार्थ, उत्पादन हे खास दर्जाचे किंवा एकमेव व्दितीय असल्याची पावती देतं.
• जी. आय. मानांकनप्राप्त उत्पादनांना कायदेशीर संरक्षण मिळते.
• जी. आय. मानांकनप्राप्त उत्पादनाच्या नोंदणीकृत उत्पादकांशिवाय होणार्या जी.आय. मानांकनाच्या अनाधिकृत वापरावर पायबंद घालता येतो.
• जी. आय. मानांकनप्राप्त उत्पादनांच्या निर्यातीला कायदेशीर संरक्षणाखाली चालना मिळते.
• उत्पादकांच्या आर्थिक समृद्धीला चालना मिळते.
• जागतिक व्यापार संघटने’च्या इतर सदस्य देशांमध्ये कायदेशीर संरक्षण मिळवण्यास यामुळे मदत होते.
हेही वाचा -