पालघर/नालासोपारा - पोलीस असल्याची बतावणी करून लोकांना फसविणाऱ्या आरोपीबाबत माहिती मिळाल्यावर आरोपीला कल्याण येथून पकडून गाडीतून आणले जात होते. त्यावेळी आंबिवली येथील रेल्वे फाटकाच्या येथे वसईच्या क्राइम ब्राँच युनिट दोनच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टीमवर जमावाने दगडफेक करत प्राणघातक हल्ला केला आहे. गाडीची नासधूस करत आरोपीला पळवून नेले. या हल्ल्यात तीन पोलिसांना दुखापत झाली असून एका कर्मचाऱ्याचे डोके फुटले आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात या हल्याप्रकरणी जमावाविरोधात जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लोकांना फसविणारा इराणी आरोपी
पोलीस सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, नालासोपारा शहरात पोलीस बतावणी करून लोकांना फसविणाऱ्या इराणी आरोपीबाबत खात्रीशीर माहिती वसईच्या क्राइम ब्राँच युनिट दोनचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संतोष गुर्जर यांना मिळाली होती. सदर आरोपींवर तीन ते चार गुन्हे दाखल असून त्याला पकडण्यासाठी क्राइम ब्राँच युनिट दोनचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष गुर्जर, अमोल कोरे, मंगेश चव्हाण, रमेश भोसले, प्रशांत पाटील, शरद पाटील आणि अमोल तटकरे यांची टीम गुरुवारी सकाळी कल्याणला गेली होती.
आंबिवलीतील प्रकार
सदर टीमने आरोपीला पकडून गाडीतून आणत असताना आंबिवली येथील रेल्वे फाटकाच्या इथे शंभर ते सव्वाशे महिला, पुरुष आणि तरुण यांच्या जमावाने सकाळी साडे अकरा ते बार वाजण्याच्या दरम्यान तुफान दगडफेक करून प्राणघातक हल्ला केला. यात पोलीस कर्मचारी अमोल कोरे याच्या डोक्यात दगड लागल्याने डोके फुटले असून तीन टाके पडले आहे. तर पोलीस कर्मचारी प्रशांत पाटील आणि अधिकारी गुर्जर यांना मुका मार लागला असून किरकोळ जखमी झाला आहे.
गाडीच्या काचा फुटल्या
सदर दगडफेकीत गाडीच्या काचा फोडून नुकसान झाले आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस अधिकारी संतोष गुर्जर यांनी सांगितले.