पालघर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील केमिकॉन केमिकल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात रासायनिक टँक फुटून वायू गळती झाल्याची घटना घडली आहे. वायू गळतीमुळे नागरिकांना याचा त्रास जाणवला असून तीन कामगारांना याची बाधा झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अग्निशमन दलाला वायू गळतीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लाँट नं- 16/25 स्थित केमिकॉन केमिकल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या रासायनिक कारखान्यात सकाळी आठ वाजताच्या सुमारास अचानक वायू गळती झाल्याने बाजूला असलेल्या कारखान्यातील कामगारांना त्रास होऊ लागला. त्यांनतर तातडीने अग्निशमन दलाला याबाबतची पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तपासणी केली असता एक रसायनाची टाकी फुटून फॉर्मलडीहाईड वाय गळती झाल्याचे आढळून आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आँक्सिजन सिलेंडर लावून कारखान्यात पसरलेल्या रसायनावर कॉस्टीक सोडा टाकून रसायनाची व त्यातून निघणाऱ्या वायूचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच तासांहून अधिक वेळ केलेल्या प्रयत्नांनंतर या वायू गळतीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले आहे.
फॉर्मलडीहाईड या वायूमुळे जळजळ होणे, घसा कोरडा होणे व चक्कर येणे असे त्रास जाणवतात. दरम्यान या वायुगळती मुळे तीन कामगारांना या बाधा झाल्याचे समोर आले असून यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. तीनही कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.