पालघर/विरार - सव्वाचार कोटींची रोख रक्कम असलेली व्हॅन घेऊन पळालेल्या गुन्ह्याचा अखेर उलगडा झाला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील ४ कोटी २३ लाख २९ हजारांची रक्कम जप्त केली आहे. आरोपींनी त्या रकमेतून विकत घेतलेली बुलेट, मोबाईलही पोलिसांनी जप्त केले आहेत. पकडलेल्या आरोपींना २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींनी गांजा पिताना या चोरीची योजना आखल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
चोरीच्या पैशांची सात दिवसांत उधळपट्टी -
आरोपी रोहीत मारू याने त्याचा मित्र अक्षय मोहिते याच्यासह एकत्र गांजा पिताना ही चोरीची योजना आखली होती. पोलिसांना चकमा देण्यासाठी त्याने मोबाईल फोन फेकून दिला होता. मात्र, पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या आधारे सर्व आरोपींना अटक केली. आरोपीने तीन लाख रुपये खर्च केले होते. त्यात सेकंड हॅंड बुलेट विकत घेतली होती. ती सुध्दा पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस उपायुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश शेट्ये, गुन्हे शाखेच्या काशिमिरा युनिटचे प्रमुख पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस हवालदार अर्जुन जाधव अशोक पाटील, पुष्पेंद्र पाटील, संजय शिंदे, मनोज चव्हाण आदींच्या पथकाने कारवाई करून आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.
२५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी; रकमेसह मुद्देमाल जप्त
पोलिसांनी तिन्ही आरोपींकडून ४ कोटी २८ लाख ७० हजार १०० रुपयांची रोख रक्कम, १ लाख ४० हजारांचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. तिन्ही आरोपींना वसई न्यायालयात बुधवारी हजर केल्यावर 25 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा -दीड वर्षापासून फरार चोरट्याला अटक; २० लाखाचे दागिने जप्त