पालघर - अल्फा मेटल कंपनीचे मालक आरिफ मोहम्मद अली शेख अपहरण व हत्या प्रकरणातील आणखी एक आरोपी शिवा ठाकूर याने बुधवारी (15 मे) आत्महत्या केली. अटकेच्या भीतीने त्याने बिरवाडी येथील एका शेतात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
9 मे'ला दिवसाढवळ्या पालघर येथील जुना सातपाटी रोड येथून आरिफ मोहम्मद यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्यांना जाळून फेकण्यात आले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रशांत संखेने अनेक दिवसांपासून याची तयारी केली होती. अपहरणासाठी टेंभोडे येथील चार मुलांना तयार केले होते. शेख यांचे अपहरण केल्यानंतर त्यांनी आपल्या बचावासाठी जोरदार प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांचे नाक-तोंड दाबून ठार मारले. आरोपी प्रशांत संखेने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी बिरवाडी गावातील शिवा ठाकूर यांची मदत घेतली. मृतदेह जाळण्यासाठी लागणारे डिझेल आणि अन्य साहित्याचा पुरवठा शिवा ठाकूरने केला होता.
आरिफ मोहम्मद खून प्रकरणातील आरोपी व संशयितांची धरपकड पोलिसांकडून सुरू आहे. मात्र, पोलिसांची कारवाई सुरू झाल्यापासून शिवा ठाकूर फरार होता. पोलिसांच्या अटकेच्या भीतीने त्याने आत्महत्या केल्याची माहिती पालघरचे पोलीस उपविभागीय अधिकारी विकास नाईक यांनी दिली आहे.