पालघर - विरार पूर्वेकडील शिरसाड-अंबाडी रस्त्यावर डंपर व खासगी बसला भीषण अपघात झाला. या अपघातात खासगी बसमधील १५ प्रवासी जखमी झाले असून २ महिला गंभीर जखमी आहेत. आज सकाळी साडेआठच्या सुमारास हायवा डंपर हा अंबाडीच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. त्यावेळी गणेशपुरीकडून वसईच्या वालीव येथे कामगारांना घेवून जाणारी बस निघाली होती. या दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली.
या अपघातात दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. दोन्ही गाड्यांच्या चालकांना किरकोळ मार लागला असून सर्व प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अनेक रुग्णवाहिकांना फोनकरून एकही रुग्णवाहिका आली नाही. स्थानिक रिक्षा व खासगी वाहनांनी जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. याठिकाणी दोन ते तीन तास वाहतूक कोंडी झाली होती मात्र, विरार पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.