पालघर/जव्हार - गेले महिनाभर नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात श्रमजीवी संघटनेने मालक सावकारांची आणि मुलं खरेदी करून त्यांना राबवणाऱ्या धनगरांची पार दाणादाण उडवली आहे. या सावकारी वृत्तीच्या लोकांनी ठाणे, नाशिक, पालघर जिल्ह्यातील गरीब कातकरी मजुरांच्या दारिद्र्य आणि अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या कोवळ्या बालकांना 500-1000 रुपये देऊन अक्षरशः गुलाम म्हणून खरेदी केले होते. नाशिक-नगर जिल्ह्यातील या घटना ताज्या असतानाच जव्हार येथील मुलगी आणि भिवंडी तालुक्यातील 2 मुलांना श्रमजीवी संघटनेने मुक्त केले असून तीन वेगवेगळ्या गुन्ह्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
500 रुपये व्यतिरिक्त काहीही दिलेले नाही - धारणहट्टी तालुका जव्हार येथील वय वर्षे 8 व 6 वर्षाच्या मुली तळेगाव तालुका अकोले अर्थात अहमदनगर जिल्ह्यातील येथे मेंढपाळ पुंडलिक कांदाडकर, देवराम कांदाडकर याच्याकडे बाल मजुरी करत होत्या. मुलगी 3 वर्षांपासून तर लहान मुलगा 1 वर्षांपासून बाल मजुरी करत होता. मुलीला पुंडलिक यांनी दिनांक 17 तारखेला शिरपामाळ जव्हार येथे सोडले, या घटनेची माहिती श्रमजीवीचे रवींद्र वाघ यांना मिळताच संघटनेचे कार्यकर्ते या प्रकरणात पुढे आले. मुलीच्या वडिलांना कांदाडकर यांनी मजुरीचे वर्षाला 12 हजार आणि एक मेंढी असे ठरविले होते. परंतु, सुरवातीला रू. 500 व्यतिरिक्त काहीही दिलेले नाही अशी माहिती समोर आली आहे.
कार्यकर्त्यांच्या पुढाकाराणे गुन्हा दाखल - या मालकाने मुलीला शेण भरणे, लेंड्या साफ करणे, दुध काढणे मेंढ्यांबरोबर फिरणे, पाणी आणणे, गाईची सफाई करणे अशी अनेक कामे देऊन रबवून घेतले. याबाबत जव्हार पोलीस ठाण्यात श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. यात मुलीची बहीण ही अद्यापही बेपत्ता असून तीचाही शोध सुरु आहे.
भिवंडीतील दोन बालकांनी घेतला मुक्त श्वास - भिवंडीतील वडवली खोताचा पाडा येथील सांगिता पवार या कातकरी महिलेने तक्रार दाखल केली आहे. आपल्या 17 वर्षीय मुलाला कर्जत तालुक्यातील ताजू येथील भिवा गोयकर या मेंढपाळाने वेठीबिगार म्हणून ठेवले असल्याचे तीने सांगितले. मालक भिवा मुलाला खूप त्रास शिवीगाळ करायचा, खूप काम करून घ्यायचा. अखेर मालकाच्या जाचाला कंटाळून तो घरी परतला. श्रमजीवी संघटनेने लहान मुलांच्या बांधबिगारीला पुन्हा एकदा उजेडात आणल्याने संगीता पवार हिने देखील पुढे येत मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
मुलाकडून कामं करून घेतली - भिवंडीमधील वाफाळे सगपाडा येथील महिलेने देखील आपल्या 12 वर्षीय मुलाला बालमजुरी आणि वेठीबिगारीची तक्रार दिली आहे. गरिबी आणि अज्ञान याचा गैरफायदा घेत संभाजी खताळ या नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील मेंढपाळाने या 12 वर्षाच्या मुलाला मजूर म्हणून 500 रुपये देऊन एक प्रकारे विकत घेतले. तिकडे नेऊन या मुलाकडून कामं करून घेतली आणि जसे हे बालमजुरी, वेठीबिगारी प्रकरण श्रमजीवी संघटनेने उजेडात आणल्यानंतर संभाजीने अरुणला घरी आणून सोडून दिले. या दोनही प्रकरणात पडघा पोलीस ठाण्यात बालकामगार प्रतिबंधक अधिनियम 1986 आणि बंधबिगार पद्धतीन (उच्चाटन) अधिनियम 1976 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (ऍट्रॉसिटी)च्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत.