पालघर- घिवली गावातील एक बोट मासेमारीसाठी गेली असता खडकावर आदळून बुडाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली. या वेळी बोटीतील ५ मच्छीमारांनी समुद्रात पोहत यशस्वीरित्या खडकांचा आधार घेत आपले प्राण वाचवले.
दर्शन पाटील हे गुरुवारी रात्री आपल्या ४ सहकाऱ्यांसह बोटीने समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. रात्रीच्या अंधारात समुद्रातील खडकांचा अंदाज न आल्याने त्यांची बोट खडकावर आदळल्याने तिला भगदाड पडले. बोटीत पाणी शिरू लागल्याने दर्शन पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह समुद्रात पोहून जवळच्या खडकावर आश्रय घेतले. त्यानंतर पाटील यांनी मोबाईलद्वारे घरी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. दरम्यान, दर्शन पाटील आणि त्यांचे सहकारी सुखरूप आहेत. मात्र, बोट बुडाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परिसरातील इतर बोटींच्या सहायाने पाटील यांच्या बोटीला समुद्राबाहेर काढण्याचे कार्य केले जात आहे.
हेही वाचा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांचा 'रूट मार्च'