पालघर - वसई महापालिकेकडून कोरोना रुग्णांबाबतीत होणारा हलगर्जीपणा समोर आला आहे. चक्क एकाच रुग्णवाहिकेतून ८ ते १० रुग्णांना कोंबून नेल्याचा धक्कादायक प्रकार नालासोपाऱ्यात उघडकीस आला आहे.
यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. नालासोाऱ्यातून वसईच्या कोविड सेंटरमध्ये जाण्यासाठी विविध भागातील रुग्णांना एकाच रुग्णवाहिकेत एकत्र नेण्यात आले. विशेष म्हणजे या रुग्णांमध्ये सौम्य व तीव्र लक्षणे असलेल्या सर्वांनाच एकत्र बसवण्यात आले होते. यामध्ये लहान मुले व वृद्धाचा समावेश होता. या सर्व प्रकारामुळे रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण असून रुग्णांची सुरक्षा धोक्यात आली आहे. यासाठी जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
कोरोना महामारीच्या दरम्यान अनेक ठिकाणी रुग्णालय प्रशासकडून हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी पीपीई किट्स उघड्यावर फेकल्याचे चित्र होते, तर काही ठिकाणी गार्बेज वेस्ट नियम धुडकावून त्याची विल्हेवाट लावल्याचे समोर आले आहे.