वसई (पालघर) - वसई-विरार शहरात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. एका बाजूला कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे त्याचबरोबर मृत्यूचेही प्रमाण वाढत चालले आहे. मागील चौदा दिवसांत शहरी व ग्रामीण भाग मिळून तब्बल 59 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
वसईत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होते आहे. वसईच्या सर्वच ठिकाणाच्या परिसरातून रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. जून महिन्याच्या अखेरपर्यंत शहरी व ग्रामीण भागातील मृतांची संख्या ही केवळ 125 इतकी होती. मात्र, जुलै महिन्यातील सुरुवातीच्या चौदा दिवसातच वसई, विरार, नालासोपारा, नायगाव आदी ठिकाणी मिळून 59 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 184 वर गेला आहे.
वसईत 19 मार्चला पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर आतापर्यंत एकूण 8 हजार 942 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 184 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये गंभीर आजार व 50 वर्षांवरील नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शहरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ होते असल्याने चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणह दिलासादाक आहे आतापर्यंत जवळपास 6 हजार 42 रुग्ण म्हणजेच 67.56 टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 1 जुलै ते 14 जुलै यादरम्यान 4 हजार 25 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.