पालघर - जव्हार येथील शेकडो वर्षाची परंपरा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या हजरत औलिया शाह सदरोद्दीन्न बदरोद्दिन हुसैनी चिश्ती (र.अ.) यांचा यांचा 567 वा उरुस महोत्सव मोठ्या जल्लोषात 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान साजरा करण्यात आला.
उरूसाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवारी (दि.२२ सप्टेंबर) जामा मस्जिद येथून जव्हार शहरात भव्य मिरवणूक निघाली व पुन्हा दर्ग्याकडे येऊन पवित्र संदल व शिरनी वाटप करण्यात आली. उरुस महोत्सवाचा दुसरा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो, या दिवशी भव्य चादर जामा मस्जिदपासून जव्हार शहरातील पाचबत्तीनाका, नेहरूचौक, गांधीचौक ते पुन्हा दर्गाह असे मार्गक्रमण करत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मुरीद व फकीर यांचा प्रामुख्याने समावेश होता. ठिक-ठिकाणी ढोल-ताशे, नगड्यांच्या वाद्य वादनाने जल्लोष करण्यात आला. मुरीद व फकीर यांनी तलवार, खंजीरचे वार करणे, सळई व जाड तारा खुपसणे यांसारखे चित्तथरारक प्रकार यावेळी सादर केले. मात्र, औलिया पीर रिफाई परंपरेच्या चित्तथरारक करामतीमुळे रक्ताचा एकही थेंब निघाला नाही, हे याचे वैशिष्ट्य होते. त्यानंतर हजरत औलिया शाह सदरोद्दीन बदरोद्दिन चिश्ती (र.अ.) यांच्या दर्ग्यावर सन्मानपूर्वक चादर चढविण्यात आली. या दिवशी रात्री सर्व उरूस समितीतर्फे नागरिकांसाठी लंगरचे आयोजन करण्यात आले.
हेही वाचा - पालघर : 'एकच जिद्द वाढवण बंदर रद्द'च्या घोषणा देत नागरिक उतरले रस्त्यावर
सर्वांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला व पहाटेपर्यंत चालणारा कार्यक्रम म्हणजे कव्वाली. या कव्वालीच्या कार्यक्रमाला हजारो चाहत्यांची उपस्थिती होती. कव्वाल हाजी मजीद शोला यांनी गायलेल्या देभक्तीवर कव्वालीवर हिंदु- मुस्लिम बांधवांनी एकच जल्लोष केला. या कव्वाली कार्यक्रमास आदिवासी आढाव समितीचे अध्यक्ष विवेक पंडित, आदिवासी विकास महामंडळचे संचालक सुनील भुसारा यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
हेही वाचा - ९३ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो
तिसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (दि. 24 सप्टेंबर) सायंकाळी जव्हार संस्थानचे राजे मेहेंद्रसिंग मुकणे यांच्या उपस्थितीत ख्वाजापिर यांचा संदल वाटप व झेंडा फलक कार्यक्रम करण्यात आला. या पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्यासह, जव्हार व आसपासच्या परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. असा हा जव्हार येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला हजरत औलिया पीर शाह सदरोद्दिन बदरोद्दिन चिश्ती (र.अ.) यांचा 567 वा उरूस हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकोप्याने मोठ्या उत्साहात साजरा केला.
हेही वाचा - मुसळधार पावसाने कापणीला आलेल्या भातपिकाच्या नासाडीची भिती
या उरूस महोत्सवादरम्यान आकाशपाळणे, वेगवेगळे खेळ, विविध प्रकारचे स्टॉल, खेळणीची दुकाने यामुळे सर्व परिसर गजबजून गेला. या उरूस महोत्सवात मोठ्या संख्येने भाविक व परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. महोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.
हेही वाचा - डहाणू परिसरात पुन्हा भूकंपाचा धक्का; 3.4 रीश्टर स्केलची नोंद
जव्हारच्या इतिहासात या शाही उरुस महोत्सवाला महत्त्वाचे स्थान असून शेकडो वर्षांपासून हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येत मोठ्या उत्साहात हा उरुस साजरा करतात.
हेही वाचा - युनिसेफ, संपर्क या संस्थेकडून पालघर जिल्ह्यातील 6 मतदारसंघातील प्रश्नांचा आढावा