वाडा (पालघर) - गडचिंचले प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींपैकी एका ५५ वर्षीय आरोपीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. या प्रकरणातील आरोपींना वाडा पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले होते. यातील एका आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्या आरोपीला पालघर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस स्टेशनमधील आरोपीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने, आता त्याच्या संपर्कातील कैद्यांसह स्टेशनमधील कर्मचाऱ्यांचीही तपासणी केली जाणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. सदर व्यक्तीचा २८ एप्रिलला स्वाॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. त्याचा रिपोर्ट काल (शुक्रवारी) उशिरा रात्री आला. यात तो पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले.
त्या कोरोनाग्रस्त कैद्याच्या संपर्कातील २१ जणांचे स्वाॅब घेण्यात येणार आहे. याची माहिती वाडा तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बुरपल्ले यांनी दिली. तर त्या कोरोनाग्रस्त आरोपी रुग्णाला वाडामधून पालघर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे, असे वाडा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक प्रदीप जाधव यांनी सांगितले.
हेही वाचा - गडचिंचले तिहेरी हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बोईसर पोलिसांचा प्रतिकात्मक दंगल नियंत्रण सराव
हेही वाचा - वादळी पावसाच्या तडाख्याने पालघरमध्ये घरांचे आणि अन्न धान्याचे नुकसान