पालघर/नालासोपारा : कोरोना नियमांचे उल्लंघन करून लग्न समारंभाचे आयोजन करत गर्दी जमविल्या प्रकरणी आशीर्वाद हाॅलच्या मालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच लग्न समारंभाच्या आयोजकांवर प्रभाग समिती 'बी' कार्यालयामार्फत कारवाई करत 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू करण्यात आला आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेकडून वेळोवेळी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे, गर्दी न करणे, सुरक्षित अंतर ठेवणे इत्यादी बाबत सुचना दिल्या जात आहेत. मात्र, तरीही सार्वजनिक ठिकाणी नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. 14 मे रोजी नालासोपारा येथील आर्शीवाद हाॅलमध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करून लग्न समारंभाचे आयोजन करत गर्दी जमविल्या प्रकरणी हाॅल मालकांवर कारवाई केली आहे. तसेच लग्नसमारंभाचे आयोजन करणारा वधुचा भाऊ प्रमोद व्यास याच्याकडून 50 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या स्थिरावली असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. नागरिकांनी नियम पाळावेत, अत्यावश्यक सेवेशिवाय घराबाहेर पडू नये, यासाठी राज्यात लॉकडाऊन लावण्यात आलंय. मात्र, अनेक ठिकाणी नागरिक कोरोना नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढू शकतो, त्यासाठी नागरिकांनी नियम काटेकोरपणे पाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा - राज्यात 34 हजार 848 नव्या रुग्णांची नोंद, तर एकाच दिवसात 960 रुग्णांचा मृत्यू