पालघर - डहाणू तलासरी भागात आज सकाळी 9 वाजून 39 मिनिटांनी 2.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. या भागात गेल्या तीन दिवसांपासून सलग भूंकपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू हा सरकता आहे, कधी तो सागरी भागात दिसून येतो तर कधी जमिनीवर.
20 ऑक्टोबरला सकाळी 2.5 रिश्टर स्केल व 21 ऑक्टोबरला 2.1 रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के या परिसरात जाणवले होते. त्यानंतर आज पुन्हा सकाळी भूकंपाचा धक्का बसला. गेल्या काही दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह पावसाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. त्यात भूकंपांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे रहिवासी मुसळधार पाऊस, शेतीचे नुकसान आणि भूकंप या तिहेरी संकटाने ग्रासले आहेत.
पावसापासून संरक्षण मिळेल म्हणून लोक घरात असतात. मात्र, घरात राहतानाही भूकंपाच्या भीतीने घराची पडझड होईल व घर कोसळले याची ही भीती नागरिकांना सतावत आहे. यापूर्वी ७ ऑक्टोबरलाही डहाणू तलासरी परिसराला नॅशनल सेंटर ऑफ सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार, 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता.