पालघर- जिल्ह्यात सध्या आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच जव्हारमधील हिरडपाडा येथील आश्रम शाळेतील 37 विद्यार्थी आणि तीन शिक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता आठवडाभरातच पुन्हा एकदा पालघरमधील नंडोरे येथील तब्बल 30 विद्यार्थी आणि एका शिक्षकाला कोरोनाची बाधा झाली आहे. 30 विद्यार्थ्यांमध्ये मध्ये तब्बल 24 विद्यार्थिनी असून 6 विद्यार्थी आहेत.
30 विद्यार्थ्यांसह एका शिक्षकाला करोनाची लागण:-
पालघरजवळ नंडोरे येथील आश्रमशाळेत नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या आश्रमशाळेतील काही विद्यार्थिनींमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर 9 विद्यार्थिनींना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर आश्रमशाळेतील 193 विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. यामध्ये 30 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. यामध्ये 24 विद्यार्थिनी व 6 विद्यार्थींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे एका शिक्षकालादेखील कोरोनाची लागण झाली आहे.
प्रशासनाकडून आश्रमशाळा सील:-
कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाकडून आश्रमशाळा सील करण्यात आली आहे. यातील 9 मुलींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, इतर विद्यार्थ्यांना आश्रमशाळेतच विलगीकरण कक्ष स्थापन करून वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात कोरोनाचे प्रमाण अधिक
कोरोनाची तीव्रता कमी झाल्यानंतर शाळा सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला होता. मात्र, ग्रामीण भागातसुद्धा आश्रमशाळेमध्ये सध्या कोरोनाची लागण होत असल्याचे उघड झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच पालघरमध्ये ग्रामीण भागात देखील कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रशासन नेमके यावर काय उपाययोजना करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.