पालघर - तारापोरवाला मत्स्यालयातील ग्रीन सी जातीच्या मादी कासवाला महिला दिनी डहाणुच्या समुद्रात सोडण्यात आले. या कासवाचे नाव तारा असे आहे. काही दिवसांपासून ती पोटाच्या आजाराने त्रस्त होती. जवळपास ५ महिने तिच्यावर उपचार करण्यात आले. शेवटी तिला समुद्रात सोडण्यात आले.
तारापोरवाला मत्स्यालयात ३ वर्षांची मादी कासव होती. ग्रीन सी जातीची ही कासव काही दिवसांपासून पोटाच्या आजाराने त्रस्त होती. त्यामुळे तिला वन विभागाच्या सुश्रुषा केंद्रात पाठवण्यात आले. येथे वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अँड अॅनिमल वेल्फेअर असोसिएशन (डब्ल्यूसीएडब्ल्यू) या संस्थेकडून डॉ. विन्हेकर यांनी तिच्यावर उपचार केले. या संस्थेतर्फेच तिचे नामकरण तारा असे करण्यात आले.
तब्बल ४५ दिवस तिच्यावर उपचार करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर तिला परत मत्स्यालयात पाठवण्यात आले. पण, तिला अन्न ग्रहण करता येत नसल्याने तिची विशेष काळजी घेण्यास सांगितले. पाच महिने देखभाल केल्यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. पण, मत्स्यालयातील टाकी तिच्यासाठी छोटी पडू लागली. त्यामुळे तिला समुद्रात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
मायक्रोचिपद्वारे होणार ताराची ओळख -
समुद्रात सोडल्यानंतर ताराची ओळख व्हावी यासाठी ताराच्या शरिरात मायक्रोचीप बसवण्यात आली आहे. ही चीप तांदळाच्या आकाराची आहे. कासवाच्या मागील पायामधील कवचाखालील त्वचेच्या पोकळीत ही चीप बसवली जाते. तिच्यात एक सांकेतीक क्रमांक असतो. तारा किनाऱ्यावर आढळल्यास तिला ओळखणे सोपे जाणार आहे.