पालघर - येथील वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या विविध विभागात ठेका पद्धतीने काम करणाऱ्या २२ कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांना सेवेतून कमी केले आहे. आस्थापनावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी त्यांना कमी केल्याचे पालिकेने सांगितले आहे. मात्र, या निर्णयामुळे स्थानिक कंत्राटी कनिष्ठ अभियंता आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.
हेही वाचा- हार-जीतचा प्रश्न नाही, या निर्णयामुळे हिंदू-मुस्लिमांमधील तणाव कमी होईल - इक्बाल अन्सारी
महानगरपालिकेच्या विविध प्रभागात १२२ कंत्राटी कनिष्ठ अभियंता कार्यरत आहेत. यापैकी विविध प्रभागात, एसटीपी, अतिक्रमण, उद्यान, डंपिंग, अग्निशमन आणि मुख्यालयातील अशा एकूण २२ कनिष्ठ अभियंत्यांना वसई विरार महापालिकेने तडकाफडकी सेवेतून बडतर्फ केले आहे. हे सर्व विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराकडे ठेका पद्धतीने कनिष्ठ अभियंता म्हणून महानगरपालिकेत कार्यरत होते.
ठेकेदाराने त्यांच्या नावाची यादी जाहीर करून आणि पत्र पाठवून या ठेकेदारांना कामावरून कमी केल्याचे कळवले आहे. या सर्वांना कामावरून कमी केले असल्याचे व कामावर हजर राहिल्यास पगाराची जबाबदारी नसल्याचे या पत्रात लिहिले आहे. मात्र, आम्हाला सेवेतून कमी करण्याआधी आम्हाला पूर्वसूचना दिली नव्हती. तसेच विनाकारण आम्हाला काढून टाकले असल्याचे बडतर्फे केलेल्या अभियंत्यांनी सांगितले आहे.
बडतर्फ केलेले कर्मचारी महापालिकेच्या सरळ सेवेत नसल्याने त्यांना महापालिकेच्या अटी शर्ती लागू होत नाहीत. तसेच महापालिका प्रभागीय विभागात अतिरिक्त असल्याने त्याचा ताण आस्थापनेवर येत होता. म्हणून जादा कर्मचारी कमी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याचे महापालिका आयुक्त बळीराम पवार यांनी सांगितले आहे.