पालघर - जिल्ह्यातील तलासरी परिसरात आज सकाळी 11 वाजून 51 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता 2.5 रीश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. चिंचले, धानीवरी, धुंदलवाडी, तलासरी भागातील नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले.
या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पालघर जिल्ह्याच्या डहाणू, तलासरी व आसपासच्या परिसरामध्ये गेल्या दोन वर्षापासून भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र सुरूच आहे. कोरोनाचे सावट असताना आज बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काहिसे भीतीचे वातावरण पसरले आहे.
दोन दिवसांपूर्वीच गुजरातमध्येही भूकंपाचे सलग तीन धक्के जाणवले होते. २४ तासांच्या अंतरात हे तीन धक्के गुजरातमधील नागरिकांनी अनुभवले. त्यात आज पालघरमध्येही भूंकपाचे धक्के जाणवल्याने, ही मोठ्या संकटाची चाहूल तर नाही ना, अशी शंका नागरिकांच्या मनात येत आहे.