पालघर/नालासोपारा - नालासोपाऱ्यात १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे..ही घटना शुक्रवारी घडली आहे. ती राहत असलेल्या परिसरातील मुलांकडून आणि पोलिसांकडून तिचा मानसिक छळ केल्याने आत्महत्या केली असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
नालासोपारा येथे राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीचे सुनील माने या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. मात्र, त्यानंतर त्याने लग्नाला नकार दिला. यामध्ये तरुणीची फसवणूक होत असल्याचे लक्षात आले असता, सुनीलविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, तपास करताना अधिकाऱ्यांकडून गैर वर्तवणूक व जबाब नोंदवत असताना अपमानास्पद वागणूक दिली. या त्रासाला कंटाळून शुक्रवारी रात्री ८ वाजता या मुलीने राहत्या घरी आत्महत्या केल्याचा आरोप तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, तरुणीच्या तक्रारीवरून तुळींज पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतरही मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपाची दखल घेऊन तपास सुरू केला आहे. या तपासात जो कोणी दोषी आढळून येईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी सांगितले आहे.
दरम्यान, या घटनेची दखल घेऊन भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांची भेट घेऊन कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. तसेच बलात्काराच्या घटना वाढत असून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी वाघ यांनी केली आहे.