पालघर - जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर असल्याच्या संशयावरून जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांची ओळख पटली असून सुशीलगिरी महाराज (३०), चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (७०, रा. कांदिवली आश्रम) व कारचालक नीलेश तेलगडे (३०) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी कासा पोलिसांनी ११० जणांना ताब्यात घेतले आहे.
गडचिंचले जमाव हल्ला प्रकरणी कासा पोलिसांनी ११० जणांना घेतले ताब्यात पालघर जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी भागात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर चोर दरोडेखोर येत असल्याच्या अफवांना पेव फुटले आहे. सुरत येथे रामगिरी महाराज यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी इको कारने सुरतडकडे निघालेल्या तिघांना गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर समजून जमावाने रोखले. जमावाने त्यांच्यावर कोयता कुऱ्हाड, दगडाने हल्ला केला. येथील वनचौकीवर कार्यरत वनरक्षकाने याची माहिती कासा पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रवाशांना त्यांच्या गाडीतून काढून पोलिसांच्या गाडीत बसवले. मात्र, त्यानंतर जमलेल्या जमावाने पोलिसांच्या गाडीवर हल्ला चढवला, पोलिसांनी आपली सुटका करून घेतली. मात्र, पोलिसांच्या गाडीतच असलेल्या प्रवाशांची जमावाने दगड काठ्यांनी मारून निर्घृण हत्या केेली. सुशीलगिरी महाराज (३०), चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (७०, रा. कांदिवली आश्रम) व कार चालक नीलेश तेलगडे (३०) अशी मृतांची नावे आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ११० जणांना ताब्यात घेतले असून ३०२, ३५३, १८८ व इतर कलम नुसार कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. सर्व ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, मुंबई कांदिवली येथून कारने निघालेले हे तीन प्रवासी पालघर जिल्ह्यातून दादरा-नगर हवेलीच्या सीमेपर्यंत पोलिसांची नजर चुकवून पोहोचले तरी कसे ? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.