पालघर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुरुवारी १० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. प्राप्त झालेल्या अहवालानुसार या १० नव्या रुग्णांमध्ये डहाणू तालुक्यातील ३ जण, पालघर तालुक्यातील बोईसर येथील ३ रुग्ण आणि वसई ग्रामीणमधील ४ रुग्णांचा समावेश आहे. पालघर जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोनाबधित रुग्णांची संख्या आता ६० वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला असून, २५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे व ३२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
डहाणू तालुक्यात ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, सारणी येथील २० वर्षीय तरुणाचा कोलकाता येथे प्रवासाचा इतिहास असून त्याची कोरोना चाचणी केली असता, पॉझिटिव्ह आढळून आला आहे. एक १८ वर्षीय तरुण ओरिसा येथून डहाणू येथे स्थलांतरित झाला असून कोरोना चाचणी केली असता, पॉझिटिव्ह आढळून आला. तसेच वाणगाव-कोमपाडा येथील ३५ वर्षीय महिला डहाणू येथे राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम विभागात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे. एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने या महिलेची कोरोना चाचणी केली असता, कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे.
पालघर तालुक्यात ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, बोईसर कातकरपाडा येथील ५ वर्षीय मुलाला व बोईसर येथील २५ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. या दोन्ही रुग्णांमध्ये SARI/ILI लक्षणे आढळल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली व ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. तसेच तारापूर येथील ३२ वर्षीय तरुण लंडन येथील प्रवासाचा इतिहास असल्यामुळे कोरोना चाचणी केली असता, कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. वसई तालुका ग्रामीणमधील वासळई येथे ८६ वर्षीय पुरुष, ८० वर्षीय स्त्री अशा दोघांना व अर्नाळा येथील ३५ व ३२ वर्षीय दोन महिलांना कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली आहे.