उस्मानाबाद - शहरातील खाजा नगरमध्ये राहणारा झिशान सिद्दीकी हा तरुण 11 जुलै रोजी घरातून गायब झाला होता. तपासानंतर भारत-पाकिस्तानच्या सीमेवरती कच्छ येथे भारतीय जवानांनी त्याला ताब्यात घेतले. पाकिस्तानी तरुणीच्या प्रेमासाठी हा तरुण भारत-पाकिस्तान सीमेवरती पोहोचला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते.
पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या एका तरुणीच्या प्रेमात पडल्यामुळे झिशान सायकलवर उस्मानाबाद ते अहमदनगरपर्यंतचा प्रवास करत पुढे मोटारसायकलने कच्छपर्यंत गेला. तिथे गाडी वाळूमध्ये अडकल्याने त्याचा पाकिस्तानात जाण्याचा बेत फसला आणि भारतीय जवानांनी झिशानला ताब्यात घेतले. त्यानंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.
आता झिशान सिद्दीकीला उस्मानाबाद पोलीस घेऊन आले असून घरच्यांच्या ताब्यात त्याला दिले आहे. त्याच्या विरोधात कलम 1 आणि 188 प्रमाणे कच्छ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेथील न्यायालयात जामीन मिळाल्यानंतर उस्मानाबाद पोलीस झिशानला घेऊन परतले आहेत.