उस्मानाबाद - जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा कधीच संपताना दिसत नाहीत. गेली सुमारे एक महिन्यापासून पाऊस पडत नसल्याने जिल्ह्यातील सोयाबीन वाळून चालले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पोटाला चिमटा घेऊन कष्ट करायचे आणि लेकरासारखा जिव लावलेले पिक डोळ्यासमोर करपल्याचे पाहणे वेदनादाई असते. अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील निपाणी गावच्या 27 वार्षिय अशोक गुंड या तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आपले जिवन संपवले आहे. दरम्यान, या तरुणाने आत्महत्येपुर्वी व्हिडीओ तयार करून आपली व्यथा मांडली आहे.
आत्महत्येपूर्वी व्हिडीओतून मांडली होती व्यथा
अशोकने आठ दिवसांपूर्वी आपल्या शेतात एक व्हिडिओ काढला होता. त्याने आपल्या शेतातील वाळत असलेल्या सोयाबीनचा व्हिडीओ काढून समाज माध्यमात शेअर करत व्यथा मांडली होती. शेतातील सोयाबीनचा पूर्णपणे धुरळा झाला असून, प्रशासन आणि विमा कंपनीने याकडे लक्ष द्यावे असे आवाहन त्याने या व्हिडिओच्या माध्यमातून केले होते. त्याचबरोबर वाळून चाललेल्या पिकांची पाहणी करून पंचनामा करावा, अशी मागणीही या शेतकऱ्याने यामध्ये केली होती.
मराठवाड्यात नापिकीचे संकट तोंडावर काढत आहे
अशोकने मंगळवारी सायंकाळी विष प्राशन करत आपली जीवनयात्रा संपविली आहे. गेल्या काही दिवसांपासून अशोक अस्वस्थ होता. असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येने गावावर शोककळा पसरली असून, पुन्हा एकदा मराठवाड्यात नापिकीचे संकट तोंड वर काढताना दिसत आहे. शिराढोन पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
'व्यथा इथल्या संपत नाही'
उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख दुष्काळी जिल्हा म्हणून नेहमी होते. मागास जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याला गणले जाते. येथील शेतकऱ्यांच्या व्यथा संपता संपत नाहीये. यापूर्वी देखील कोरड्या दुष्काळामुळे येथील अनेक शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली होती. सुरवातीला पाऊस चांगला झाल्याने अनेकांनी मोठ्या उत्साहाने पेरण्या केल्या. मात्र, नंतर पावसाने हुलकावणी दिल्याने पिके करपून जाण्याची वेळ आली आहे. या समस्येला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने आपलं जीवन संपवल यामुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.