उस्मानाबाद - वारकरी संप्रदायातील विचारधारांनी समृद्ध झालेल्या आणि संत परीक्षक म्हणून संबोधले गेलेले संत गोरोबाकाका यांचे आज तेर येथे आषाढी एकादशी निमित्त बहुसंख्य भाविकांनी दर्शन घेतले. या परिसरात संत गोरोबाकाका यांचे येथे समाधी स्थळ आहे. या परिसराला प्रतिपंढरपूर अशी ही ओळख निर्माण झाली आहे.
संत गोरोबाकाका अडचणीत असताना त्यांच्या मदतीसाठी म्हणून खुद्द पांडुरंग येथे कुंभार बनून वास्तव्यास आले होते, अशी आख्यायिका सांगितली जाते . प्रत्येक एकादशीला येथे वारकऱ्यांची गर्दी जमते. तसेच दररोज हजारो वारकरी भक्त येथे दर्शनासाठी येतात.
तेराव्या शतकातील जन्म असलेल्या संत गोरोबाकाका यांनी सातशे वर्षापूर्वी कालेश्वर मंदिराच्या शेजारी येथे जिवंत समाधी घेतली. दरवर्षी येथे चैत्र वद्य त्रयोदशीला संत गोरोबा काका समाधी सोहळा साजरा केला जातो. या सोहळ्याला राज्यभरातील वारकरी टाळकरी फडकरी दिंड्या पालख्यासह तेर येथे दाखल होतात.