उस्मानाबाद - तुळजापूर मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मधुकर चव्हाण हे विद्यमान आमदार आहेत. चव्हाण या मतदारसंघातून सलग ५ वेळेस निवडून आले. 2014 च्या विधानसभेत मोदी लाटेतही चव्हाण यांना ७० हजार ७०१ मते पडली. 2014 मध्ये सेना, भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेस हे वेगवेगळे लढले होते. राष्ट्रवादीचे जीवनराव गोरे यांना ४१,०९१ मते पडली. त्यामुळे चव्हाण २९,६१० मतांनी निवडून आले. मधुकर चव्हाण यांचे 85 वय असतानाही २०१९ च्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ते विजयाचा षटकार मारणार काय, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
धोतर, कुर्ता असा पेहराव असलेले मधुकर चव्हाण विधिमंडळातील वयस्कर आमदार आहेत. चव्हाण यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे जनतेशी थेट संपर्क व कामे करणे ही त्यांच्या जमेची बाजू आहे. मात्र, तुळजाभवानी तीर्थ क्षेत्राचा म्हणावा तितका न झालेला विकास, बंद पडलेले साखर कारखाने, सूतगिरण्या यामुळे त्यांच्यावर टीका होते. त्यामुळे आता तरुण आमदार हवा असे विरोधक प्रत्येक निवडणुकीत बोलतात. मात्र, त्यांना अद्याप यश आलेले नाही. आमदार चव्हाण माजी मंत्री होते. मात्र, त्यांच्या काळात मोठे उद्योग, व्यवसाय आले नाहीत असे बोलले जाते.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी भाजपकडून मंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख, संजय निंबाळकर, देवानंद रोचकरी, अनिल काळे यांच्यासह अनेक जण उत्सुक आहेत. तर शिवसेनेकडून कैलास पाटील व इतर मंडळी प्रयत्नशील आहेत. देवानंद रोचकरी हे प्रत्येक विधानसभा लढवित आले आहेत. त्यांना वैयक्तिक मानणारा एक गट आहे. १९९९ पासून रोचकरी आमदार बनण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील सर्वच पक्षात काम केली आहेत. विधानसभा लढवतेवेळी कधी अपक्ष, समाजवादी पक्ष, शेकाप तर कधी मनसे असा रोचकरी यांचा रोचक प्रवास आहे. आता ते भाजपात आहेत.
तुळजापूर मतदारसंघातील राजकीय गणित थोडे अजब आहे. कारण विधानसभेला अनेकजण चव्हाण यांना अंतर्गत मदतीचा हात देतात. राष्ट्रवादीचे महेंद्र धुरगुडे हेही उत्सुक असून उद्योजक अशोक जगदाळे यांनी देखील मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मूळचे राष्ट्रवादीचे असलेले जगदाळे यांनी सध्या जिल्हास्तरीय पक्ष नेतृत्वावर नाराज होत फारकत घेतली आहे. त्यामुळे ते पक्ष बदलण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.