उस्मानाबाद - जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. याचा फटका विविध तीर्थक्षेत्रांनाही बसला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरमधील तुळजाभवानी मंदिर आज (मंगळवार) पासून बंद असणार आहे. मात्र, या काळात देवीचे सर्व धार्मिक विधी आणि पूजा केल्या जाणार आहेत. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मंदिर संस्थानने हा निर्णय घेतला.
आजपासून देवीचे मंदिर सरकारचे पुढील आदेश येईपर्यंत बंद असणार आहे. तुळजाभवानी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा देखील रद्द करण्यात आली आहे. आज पहाटे देवीची पूजा करण्यात आली आणि त्यांनतर सर्व भक्तांच्यावतीने देवीच्या मूर्तीवर एकच अभिषेक घालण्यात आला.
हेही वाचा - कोरोना इफेक्ट: तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी बंद
या काळात देवीची पूजा आणि इतर विधी हे देवीचे महंत आणि पाळीकर पुजारी करणार आहेत. मात्र, एकाचवेळी चारपेक्षा जास्त पुजाऱ्यांना मंदिरात उपस्थित राहता येणार नाही. मंदिरातील इतर कर्मचऱ्यांना देखील कमी करण्यात आले असून या काळात देवीची चरण तीर्थ, प्रक्षाळ पूजा, अभिषेक पूजा आणि सिंहासन पूजा या भक्तांसाठी बंद असणार आहेत. दरम्यान, देवीचे मंदिर पूर्णत: बंद न ठेवता मुखदर्शन सुरू ठेवण्याची विनंती भाविकांनी केली आहे.