उस्मानाबाद - गेल्या सात वर्षांपासून बेपत्ता असलेला रुईभर गावातील तरुण दत्तात्रय सोपान माने (वय 31) हा तरुण टिकटॉकमुळे घरी परतला आहे. दत्तात्रय गतिमंद असून 2012 मध्ये तो बेपत्ता झाल्याची तक्रार बेंबळी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
आठ दिवसांपूर्वी टिकटॉक एॅपवर या बेपत्ता तरुणाचे चित्रीकरण असलेला एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. गावकऱ्यांनी व नातेवाईकांनी तो व्हिडिओ बघताच बेंबळी पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर उस्मानाबाद पोलिसांच्या सायबरसेलच्या महिला पोलीस उपनिरीक्षक क्रांती ढाकणे यांनी हा व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीचा युजर आयडी व इतर काही व्हिडीओत दिसणाऱ्या कारच्या क्रमांकावरुन कार मालकाचा पत्ता मिळवला. चौकशीअंती हा तरुण पुणे जिल्ह्यात शिरुर तालुक्यातील भोसे वस्ती निमोणे या गावी असल्याचे समजले. बेंबळी पोलिस तरुणाच्या नातेवाईकांसह भोसे वस्तीत जाऊन तरूणाला घेऊन उस्मानाबादला परतले.
अशा पद्धतीने सात वर्षांपासून बेपत्ता असलेला गतिमंद तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा घरी परतला. दत्तात्रय घरी परतल्याच्या आनंदात त्याची गावातील नागरीकांनी वाजत-गाजत मिरवणूकदेखील काढली. या घटनेमुळे सोशल सदुपयोगसुद्धा करता येऊ शकतो, याची प्रचिती उस्मानाबाद येथे आली.