उस्मानाबाद - महामार्ग पोलिसांनी काल शनिवारी अंदाजे 80 ते 90 लाख रुपयांचा गुटखा पकडला. मात्र, या प्रकरणी अद्याप कुठलीही तक्रार उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली नाही. येडशी टोलनाक्याजवळ महामार्ग पोलिसांनी तपास मोहीम राबवली होती. या तपासात बीड जिल्ह्याच्या दिशेने निघालेल्या एका टेम्पोमध्ये गुटखा आढळला होता. त्यामुळे पोलिसांनी तो गुटख्याने भरलेला टेम्पो ताब्यात घेतला.
गुटख्याने भरलेला टेम्पो ताब्यात घेतल्यानंतरही अद्याप या प्रकरणी कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. अन्न आणि औषध प्रशासन विभागानेदेखील या अवैद्य गुटखा वाहतूक प्रकरणी तक्रार दिलेली नाही. महत्वाचे म्हणजे पोलिसांनी गुटखा पकडल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाची भूमिका महत्त्वाची असते. मात्र, शनिवार आणि रविवार या 2 दिवसाची सुट्टीचे कारण सांगून अन्न आणि औषध प्रशासनाने आपल्या कामात निष्क्रियता दाखवल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणी पोलिसांची भूमिकाही संशयास्पद असून 'ईटिव्ही भारत'ला मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास गुटख्याने भरलेला टेम्पो पकडण्यात आला. मात्र पोलिसांकडून 8:20 मिनिटाला टेम्पो पकडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे 5 ते 8:20 हा मधला वेळ पोलिसांनी कशासाठी घेतला, असा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.