उस्मानाबाद - तुळजापूर आणि तुळजाभवानी मंदिर सतत होणाऱ्या वेगवेगळ्या भ्रष्टाचारामुळे चर्चेत असते. अशात आता आणखी 1 नवे प्रकरण उघडकीस आले आहे. तुळजाभवानी मंदिरातील एकूण 71 पुरातन नाणी चोरीला गेल्याचे उघड झाले असून ही चोरी मंदिर संस्थानातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने केली असल्याचे समोर आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल एका संस्थेने जिल्हाधिकारी आणि विधिमंडळास सादर केला. तुळजाभवानी मंदिरातील पुजारी व पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगने यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर मंदिर संस्थानकडून प्रकरणाची गेली 8 ते 9 महिने चौकशी सुरू होती. या चौकशीनंतर प्रकरणात मंदिर संस्थानमधील अनेक आजी माजी कर्मचारी सहभागी असल्याचे समोर आले आहे. या सर्वांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मंदिरातून गायब झालेली नाणी -
बिकानेर संस्थान-४, औरंगजेब-१, डॉलर-६, चित्रकूट, जयपूर संस्थान 3, शहाआलम इझरा-४, बिबा शुरू-१, फुलदार-१, दारुल खलिफा-१,फते औरंगाबाद औरंगजेब आलमगीर-१, इंदूर स्टेट सूर्य छाप-१, अकोट-२, फरुखाबाद-१, लखनौ-१, पोर्तुगीज-९, इस्माईल शहा-१, अशी वेगवेगळ्या संस्थानातील राजे रजवाडेंनी तुळजाभवानीला अर्पण केलेली सोन्याची 71 पुरातन प्रकारची नाणी गायब झाली आहेत.