उस्मानाबाद - कोरोना विषाणूमुळे सर्व जिल्ह्यांतील प्रशासनाची धावपळ होत आहे. मात्र, उस्मानाबाद जिल्हा प्रशासन आणि नागरिकांना याचे गांभीर्य असल्याचे दिसत नाही. शनिवारी उमरगा शहरातील तहसील कार्यालयासमोर सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडत असंख्य महिला एकत्र जमा झाल्या होत्या.
काँग्रेसचे माजी आमदार बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यालयाच्या समोर किराणा किटचे वाटप करण्यात येत होते. त्यावेळी तेथे वाढलेली गर्दी लक्षात घेऊन किराणा किट वाटपकर्त्यांनी किराणा किट असलेली गाडी तहसील कार्यालयाकडे पाठवून दिली. मात्र, महिलांचा लोंढा वाढत गेला आणि या महिला गाडीच्या सोबतच तहसील कार्यालयात जमा झाल्या. त्यामुळे येथे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडाल्याचे पहायला मिळाले.
गेल्या कित्येक दिवसापासून लॉकडाऊन असल्यामुळे लोकांच्या घरातील खाण्यापिण्याचे साहित्य संपले आहे. तर हातातील काम सुटल्याने अनेक लोकांच्या खाण्या-पिण्याचे वांदे झाले आहेत. त्याचबरोबर प्रशासनही अशा लोकांना मदत करताना कमी पडत आहे, त्यामुळेच सोशल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी तुडवत किराणा किट मिळण्याच्या अपेक्षेने महिलांनी उमरगा तहसील कार्यालयासमोर गर्दी केली.