उस्मानाबाद - शिवसेनेच्या अंतर्गत कलहानंतर ओम राजेनिंबाळकर यांना लोकसभेची उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यानंतर नाराज असलेले विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. तरी उमरगा येथे खासदार गायकवाडांना तिकीट मिळत नाही, तोपर्यंत आम्ही कपडेही घालणार नाही असा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला.
मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर खासदार गायकवाड शांत झाले, असे शिवसेनेकडून सांगितले गेले. मात्र अद्यापही खासदार रवींद्र गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली नाही. त्यातच खासदार गायकवाड यांच्या जवळचे असलेले समर्थक बसवराज वरनाळे यांनी बंडखोरी करुन उमेदवारी अर्ज दाखल केला. वरनाळे हे शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आहेत.
खासदार रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारल्याने वरनाळे यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि खासदार रवींद्र गायकवाड या बाबतीत काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे. वरनाळे यांनी अर्ज कायम ठेवल्यास ओमराजें निंबाळकर यांना उमरगा लोहारा तालुक्यात थोडाबहुत फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.