उस्मानाबाद - शहरात प्रजासत्ताक दिनापासून 2 ठिकाणी गरीब आणि गरजूंना शिवभोजन थाळीचा लाभ घेता येणार आहे. विधानसभा निवडणुकीत गाजलेल्या या थाळीला मूर्त स्वरूप येणार असून, शहरात दररोज 250 थाळी विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.
शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथील उपहारगृह व मध्यवर्ती बस स्थानकातील उपहारगृहात ही शिवभोजन थाळी मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शिवसेनेने 10 रुपयात जेवण मिळेल, असे वचन दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी योजना म्हणूनही या शिवभोजन थाळीकडे पाहिले जात आहे.
अशी असणार थाळी -
10 रुपयांच्या थाळीमध्ये ग्राहकांना 30 ग्रॅम वजनाच्या 2 चपाती, 100 ग्रॅम वजन असलेली 1 वाटी भाजी, 1 वाटी वरण आणि भात मिळणार आहे.
प्रथम ही योजना शहरी भागात राबवली जाणार असून या योजनेतून उस्मानाबाद जिल्ह्यात 250 थाळ्या मंजूर करण्यात आल्या आहेत. सदरील ठिकाणी दुपारी 12 ते 2 दरम्यान भोजन सुरू राहील.