उस्मानाबाद - शहराला वळसा घालून राघूचीवाडी, चिलवडी, झरेगाव या गावांमधून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या भोगावती नदीतील वाळू ग्रामसेवकाने उपसली आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे कुठलीही माहिती नसल्याने प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. ग्रामसेवकाने वाळू उपसा करुन त्याचा साठा स्वतःच्या शेतात करुन ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका गावातील ग्रामसेवकाच्या (वडिलांचे नावे जमीन) शेतामध्ये भोगावती नदीमधील अंदाजे दीड कोटी रुपये किंमतीची वाळू सापडली आहे. गेल्या दहा दिवसांपासून या भोगावती नदीतील वाळू उपसा सुरू होता मात्र, याची कल्पना महसूल (गौण खनिज) अधिकार्यांना नव्हती. वाळू उपश्यावर निर्बंध असताना देखील कोट्यवधी रुपयांची वाळू काढली आहे. परंडा तालुक्यातील तहसीलदार अनिल हेळकर यांच्यावरती केलेल्या वाळूमाफियांनी हल्ल्यासंदर्भात महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करुन जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले होते. मात्र, शासकीय कर्मचारी आता वाळूमाफीया झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.
भोगावती नदीमधील वाळू उपसण्यासाठी याच परिसरात प्रचंड वृक्षतोडी केली असून, पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसानही केले आहे वृक्षतोडीबाबत वनविभागाचे परवानगी घेतली नसल्याचे समजते आहे.
जेसीबीच्या साह्याने केला वाळू उपसा -
सलग पाच दिवस रात्रंदिवस वाळू उपसा सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी पत्रकारांना सांगितली आहे. यासाठी जेसीबी व चार ट्रॅक्टरचा वापर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.