उस्मानाबाद - ग्रामसेवकाने भोगावती नदीमधील वाळू ढापल्याचे प्रकरण ईटीव्ही भारतने उघडकीस आणल्यानंतर या प्रकरणी महसूल प्रशासनाने चौकशी व्यतिरिक्त कोणतीच कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. महसूल प्रशासन या ग्रामसेवकाला पाठीशी घालत असल्याचे समोर आले आहे.
- काय आहे प्रकरण -
शहराला वळसा घालून राघूचीवाडी, चिलवडी, झरेगाव या गावांमधून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या भोगावती नदीतील वाळू एका ग्रामसेवकाने उपसली आहे. यासंदर्भात ईटीव्ही भारतवर वृत्त प्रकाशित झाल्यानंतर महसूल प्रशासनाने चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
- 8 दिवस उलटून कोणती कारवाई नाही -
यासंदर्भात तहसीलदार गणेश माळी यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवर यांनी महसूल प्रशासनाने आमच्याकडे तक्रार केली, तर ग्रामसेवकाला निलंबित करू, अशी प्रतिक्रिया दिली आहे. या वाळू चोरी प्रकरणाला 8 दिवस झाले आहेत. तरीही महसूल प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामसेवकावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
- चौकशीत टाळले ग्रामसेवकाचे नाव -
महसूल प्रशासनाकडून तलाठी, मंडळ अधिकारी आणि नायब तहसीलदार या दोघांनी अहवाल सादर केले आहेत. या दोन्ही अहवालांमध्ये मोठी तफावत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर या पंचनाम्यात जाणीवपूर्वक ग्रामसेवकाच्या नावाचा उल्लेख करणं अधिकाऱ्यांनी टाळले आहे. वास्तविक पाहता या ग्रामसेवकाने गिरीधर रंगनाथ एडके या नावाची रॉयल्टी भरली असल्याचे या अहवालात म्हटले आहे. मात्र, वाळू चोरी प्रकरणी गिरीधर रंगनाथ एडके यांचे नाव रद्द करून ग्रामसेवकांच्या वडिलांचे रंगनाथ एडके यांचेच नाव या अहवालात आहे.
ग्रामसेवकाच्या नावावर असलेल्या क्षेत्रावरही देखील वाळू साठा केला असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे महसूल प्रशासन जाणीवपूर्वक ग्रामसेवकाला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.