उस्मानाबाद - 'पुस्तक चाळतानाची जी मजा आहे ती ई-बुक मध्ये कुठे?' त्यामुळे काळाच्या ओघात पुस्तक खरेदीचे मार्ग बदलले असले तरी पुस्तकांच्या विक्रीवर त्याचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे. उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनात 250 ते 300 बुकस्टॉल लागले आहेत. तेव्हा वाचक आणि प्रकाशन संस्था यांच्याकडून ई-बुकचा परिणाम काय झाला याबाबत जाणून घेतले असता हे सत्य समोर आले आहे.
हेही वाचा - साहित्याची जत्रा : जळगावातील ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांची विशेष मुलाखत
अखिल भारतीय साहित्य संमेलनात विविध प्रकाशन संस्थांचे जवळपास 300 बुकस्टॉल उभारण्यात आले आहेत. दिवसाकाठी हजारो वाचक लाखोंची पुस्तके खरेदी करीत आहेत. बदलत्या काळाप्रमाणे वाचकांकडून पुस्तक खरेदीचे मार्ग बदलले असतील परंतु, अजूनही वाचक पुस्तके खरेदी करूनच वाचण्यास पसंती देत आहेत. शिवाय वाचक चांगला प्रतिसाद देत आहेत. 'हातात पुस्तक घेऊन चाळण्यात जी मजा आहे ती ई-बुक मध्ये कुठे?' असे मत वाचकांनी व्यक्त केले आहे.
पुस्तकातील दृक अनुभव हा महत्वाचा आहे. ई-बुक वाचण्याचा एक वर्ग आहे परंतु, तो पुस्तके खरेदी करत नाही असे नाही. आजही पुस्तकाचा संग्रह करणारे भरपूर वाचक आहेत. त्यामुळे पुस्तक खरेदीची पद्धती बदलली असली तरी वाचन संस्कृती टिकून असल्याची भावना साहित्य संमेलनात व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - मराठी नवकवितेचे जनक बा. सी. मर्ढेकरांच्या नशिबी उपेक्षाच!