उस्मानाबाद - शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना तिकीट नाकारल्याने त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. गायकवाड यांना तिकीट नाकारल्याने त्यांचे समर्थक बंडाच्या तयारीत आहेत. शनिवारी झालेल्या बैठकीत गायकवाड यांनी अपक्ष निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
उस्मानाबाद लोकसभेसाठी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना शिवसेनेकडून तिकीट देण्यात आले आहे. रविंद्र गायकवाड यांचा पत्ता कट केल्याने ते आता बंडाच्या तयारीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर जाऊन सामूहिक राजीनामे देण्याची तयारी केली आहे. तिकीट दिले नाही तर गायकवाड यांचा अपक्ष अर्ज भरायचा असा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत झाला आहे.
काही कार्यकर्त्यांनी गायकवाड यांना जोपर्यंत उमेदवारी मिळत नाही तोपर्यंत अंगावर कपडे घालणार नाही अशी घोषणा केली आहे. तर बाबा भोसले या कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. हे सगळे होत असताना विद्यमान खासदार मात्र देवदर्शनात व्यस्त होते. गायकवाड यांनी काल गाणगापूर येथे संगमावर जाऊन दत्तांचे दर्शन घेतले. समर्थक एवढे आक्रमक होवून बंडाच्या पवित्र्यात असताना गायकवाड यांच्या मुला व्यतिरिक्त या मेळाव्यात समर्थकांशिवाय कोणीही फिरकले नाही. यामध्ये गायकवाडांची नेमकी भूमिका काय हे अद्यापही समजले नाही.