उस्मानाबाद - जिल्ह्यात आजघडीला चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. हा वाढणारा धोका लक्षात घेऊन उस्मानाबाद शहरामध्ये बाहेरगावाहून येणार्या नागरिकांच्या घरावर क्वारंटाईन असे स्टिकर लावण्यात येणार आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या काही केल्या कमी होत नाही. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची आरोग्य विभागाने तपासणी केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन अथवा होम क्वारंटाईन केले जाते. मात्र, होम क्वारंटाईन केलेले नागरिक हातावर मारलेले आरोग्य विभागाचे शिक्के पुसून घराबाहेर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे नगर परिषदेमार्फत होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींच्या दरवाजाला सूचना असणारे स्टिकर लावण्यात येत असून त्यासाठी प्रभागनिहाय कर्मचार्यांचीही नियुक्ती केली आहे.
होम क्वारंटाईन केलेले असतानाही घराबाहेर फिरत असल्याने आसपासचे लोक त्या व्यक्तीच्या किंवा घराच्या संपर्कात येत आहेत. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढू शकतो. यासाठी नगर परिषदेच्या वतीने होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांच्या घरासमोर सुचना असलेले स्टिकर लावण्यात येत आहेत. यावेळी त्या व्यक्तीचा क्वारंटाईन कालावधी किती दिवसांचा याची माहितीदेखील या स्टिकरवर लावण्यात येणार आहे.