उस्मानाबाद - येथून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या तेर या गावाला प्रतिपंढरपूर असे संबोधले जाते. येथे संतांचे परीक्षक असलेले संत गोरोबा काका यांचे निवासस्थान आहे. गोरोबा काका यांनी चैत्र वद्य त्रयोदशी शके 1239 ला येथे समाधी घेतली. आजपर्यंत सर्वच संतांनी महादेव मंदिराच्या शेजारीच समाधी घेतली आहे. परंतू संत गोरोबाकाका यांनी भगवान कालेश्वर मंदिराच्या बाजूला समाधी घेतली आहे.
भगवान कालेश्वराचे मंदिर जवळपास दोन हजार वर्षापूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. हे मंदिर कारबिलिंग पद्धतीतून उभारल्याचे सांगितले जात असून कालेश्वराचे मंदिर हे महादेवाचे अति प्राचीन शिवालय आहे. या मंदिराचे शिखर दक्षिणात्य द्रविड शैलीचे आहे. या मंदिराची निर्मिती राष्ट्रकूटांच्या काळातील असावा असा काही इतिहास संशोधकांचे मत आहे. डॉ. एम.व्ही. नाईक यांच्या मते महेश्वराचे परम भक्त असणाऱ्या कलचुरी राजा वर्षाच्या राजवटीत साधारणपणे इसवी सन 610 च्या सुमारास हे मंदिर बांधले गेले असल्याचे ते सांगतात. तेर म्हणजे पौराणिक त्रयोदशी व अवर्चिन तेरणा नदीच्या दक्षिण काठावर असून समुद्र सपाटीपासून साधारणपणे दोन हजार फूट उंचीवर वसलेले एक सुंदर प्राचीन असे गाव आहे. तसेच येथे भव्य असे भगवान कालेश्वराचे मंदिर आहे.
तेरचा इतिहास हा खूप जुना आहे. या गावाला अनेक कालखंडात वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. यात तगर, तगरूर, शांतापुरी आणि तेरापूर अशी अनेक नावे तेर या गावाला होती. तेर हे रोमन साम्राज्यासोबत व्यापारासाठी जोडले होते. याठिकाणी संत गोरोबाकाका यांनी जिवंत समाधी घेतली. गोरोबाकाका हयात असताना त्यांच्या पत्नीने मला स्पर्श करू नका, स्पर्श कराल तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ अशी शपथ गोरोबाकाकांना घातली होती. यावेळी गोरोबा काकांकडून चुकून पत्नीला स्पर्श झाला. त्यामुळे त्यांनी स्वतःचे हात कापले. त्यानंतर त्यांच्यावर अनेक आर्थिक संकटे कोसळले. कुंभाराची काम करणे हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता. गाडगे बनवणे, रांजण बनवणे तसेच मातीपासून चूल बनवणे हा गोरोबा काकांचा व्यवसाय होता.
गोरोबा काका कडून शपथ मोडल्यामुळे स्वतःचे हात तोडून घेतले. हात नसल्याने त्यांचे काम बंद पडले. यावेळी संत गोरोबाकाकांच्या मदतीसाठी खुद्द पांडुरंग कुंभार बनवून तेरमध्ये आले. आणि गोरोबा काकांची सर्व कामे करू लागले अशी आख्यायिका सांगितली जाते. तेव्हापासूनच तेरला प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर संत गोरोबाकाका यांची संत परीक्षक अशी वेगळी ओळखही आहे.