उस्मानाबाद- तुळजापूर सोलापूर या मार्गावर तामलवाडी येथील कांचन हॉटेल शेजारी इंधन टँकरमधून इंधन चोरी करणाऱ्या 8 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल एक कोटी २३ लाख ८९ हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करत इंधन चोरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
तामलवाडी येथील स्थानिक राजकारण्यांच्या सहकार्याने येथे गेल्या अनेक वर्षांपासून इंधन चोरीचे रँकेट सुरू होते. याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांना मिळाली. सोलापूर-तुळजापूर रस्त्यावरून पेट्रोल, डिझेलचे टँकर उस्मानाबाद लातूर जिल्हयात वितरीत करण्यासाठी जातात. कांचन बिअर बार शेजारील गटनंबर 389मध्ये इंधन टँकरमधून चोरुन विकण्यासाठी काढले जात होते, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांना मिळताच त्यांनी तत्काळ तिथे छापा मारला असता इंधन टँकरमधून पाइपच्या साहाय्याने इंधन काढण्यात येत असल्याचे समजले. हे सर्व इंधन काळ्या बाजारात कमी किमतीत विक्री करण्यासाठी टँकर चालकांना थोडे पैसे देवुन काढत असताना आढळून आले. यावेळी राजू उल्हास पिरंगे व इतर सात टँकर चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले व गुन्हा नोंदवण्यात आला.