उस्मानाबाद - जिल्ह्याची छाती अभिमानाने फुलून यावी असे कार्य येथील एका मुलीने करून दाखवले आहे. आशिआई स्पर्धांमध्ये भारतीय महिला खो-खो संघाचे नेतृत्व केलेल्या सारिका काळे हीची यावर्षीच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झाली आहे. अगदी हालाखीच्या परिस्थितीत सारिकाने हे दैदिप्यमान यश मिळवले आहे.
उस्मानाबादच्या उंबरे कोटा येथे सारिका तिच्या कुटुंबासह राहते. तिच्या घरची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे. तिचे वडील एका हाताने अपंग आहेत. तिच्या आईने व आजीने अथक परिश्रम करत मिळत ते काम करून सारिकाला घडवले आहे. सरिकाचे शालेय शिक्षण उस्मानाबादच्या श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे व पदवीचे शिक्षण तेरणा महाविद्यालयात झाले आहे.
सारिकाला लहानपणापासूनच खो-खोची अवड होती. मात्र, सुरुवातीला तिच्या खो-खो खेळण्याला तिच्या वडिलांचा विरोध होता. आपल्या प्रशिक्षकांच्या मदतीने तिने आपली आवड जोपासत हळूहळू यशाची शिखरे पादक्रांत केली. सारिकाची पहिल्यांदा महाराष्ट्र संघात निवड झाली त्यानंतर अथक परिश्रम घेऊन तिने सलग २० राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळत वेगवेगळी पदके मिळवली आहेत. तिने आतापर्यंत सांघिक खेळामध्ये १२ सुवर्ण, ४ रौप्य व ४ कांस्य पदक मिळवली आहेत. सारिकाच्या घरी आता ट्रॉफी आणि वेगवेगळ्या पदकांचा खच पडला आहे. २०१०-११ला सारिकाची प्रथमच महाराष्ट्राच्या संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. त्यानंतर छत्तीसगडमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये सारिकाने सुवर्णपदक मिळवले.
२०१५-१६ मध्ये सारिकाची भारतीय संघात निवड झाली. २०१६ मध्ये आसामच्या गुवाहाटी येथील खो-खो स्पर्धेत तिच्या संघाने सुवर्णपदक मिळवले. त्याचबरोबर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या खो-खो संघाची सदस्य होण्याचा आणि याच स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्याचा बहुमानही तिला प्राप्त झाला आहे. शासनानेही तिचा गौरव करत तिची तालुका क्रीडा अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. सध्या सारिका तुळजापूर तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
अर्जुन पुरस्कारासारख्या मानाच्या पुरस्कारासाठी आपली शिफारस झाली, याचा खूप आनंद होत असल्याचे सारिकाने सांगितले. तिचे क्रीडा प्रशिक्षक आणि कुटुंबीयही तिच्या यशाने अत्यानंदित झाले आहेत.