उस्मानाबाद - भूम तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी मनीषा राशीनकर आणि कोतवाल विलास जानकर या दोघांना विना कारवाई वाळू व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी 1 लाख 10 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सायंकाळी सापळा रचून ही कारवाई केली आहे.
परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील एका वाळू वाहतूक करणाऱ्या विक्रेत्यास वाळूचा व्यवसाय चालू करण्यासाठी उपविभागीय अधिकारी राशीनकर यांच्याकडून पैशाची मागणी केली होती. यात एक लाख 10 हजार रुपयांचा हफ्ता लाच मागण्यात आली होती. तक्रारदार यांचा सूत्रधार व त्याच्या पाहुण्यांचा जेसीबी व तीन ट्रॅक्टर हे विना कारवाई वाळू वाहतुकीसाठी चालू देण्यासाठी ही लाच देण्यात आली होती. तक्रारदार यांनी उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबतची तक्रार केली.
तक्रारीची खात्री केल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या सूचनेनुसार 27 जुलै मंगळवारी रात्री 6:59 मिनीटे वाजण्याच्या सुमारास भूम शहरातील आहमदनगर रोडवरील आयडीबीआय बँकेजवळ असलेल्या चहाच्या टपरीच्या जवळ सापळा रचला. 1 लाख 10 हजारची मागणी करून नंतर 90 हजार रुपये देण्याचे ठरले. त्यातील पहिला हप्ता म्हणून 20 हजार रुपये कोतवाल विलास जानकर (वय 32 वर्षे) यांच्याकडे रकमेसह ताब्यात घेण्यात आले.
अधिकाऱ्यांना अटक
याप्रकरणी भूम येथील उपविभागीय अधिकारी मनीषा राशीनकर आणि कोतवाल विलास जानकर याला अटक करण्यात आली. तरी या प्रकरणी उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकर यांच्यासह,कोतवाल विलास जानकर यांच्या विरुद्ध भूम पोलीस ठाण्यात दिनांक 28 जुलै रोजी पहाटे 4:40 वाजता भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत भुम पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
अधिकारी प्रशांत संपते,पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद यांनी डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. या पथकात पोलिस निरीक्षक गौरिशंकर पाबळे, अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, विशाल डोके यांचा समावेश होता. या प्रकरणामुळे उस्मानाबाद लाचलुचपत विभागाच्या या कारवाईत महसूल विभागाचा एक वरिष्ठ दर्जाचा एक मोठा मासा जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे.
वाळू विक्रेत्यांमध्ये घबराट
उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध वाळू व्यवसाय तेजीत सुरू असून अधिकारी यांना दरमहा लाखो रुपयांची लाच द्यावी लागते हे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. जिल्ह्यातील एक वरिष्ठ अधिकारी वाळू विक्रेत्याने लाचखोरीत अडकवल्याने आगामी काळात अवैध वाळू विक्रेत्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळू नये म्हणजे झाले. त्यामुळे अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांनी देखील या करवाईचा धसका घेतला आहे.
हेही वाचा - अमरावतीत साडेतीन कोटी रुपये पकडले; दोन स्कॉर्पिओसह सहा जणांना घेतले ताब्यात