उस्मानाबाद - कोरोना विषाणू या साथीच्या व संसर्गजन्य आजाराविरुध्द समाजात जनजागृती व्हावी, लॉकडाऊन संबंधी नियमांचे पालन व्हावे. या उद्देशाने उस्मानाबाद जिल्हा प्रशासना तर्फे उस्मानाबाद शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे व पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या नेतृत्वाखाली हा रुट मार्च काढण्यात आला. शहरातील प्रमुख चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथुन रॅली सुरू करण्यात आली. रॅलीतील प्रशासनाची वाहने देशपांडे स्टँड- शम्स चौक- जिल्हा सामान्य रुग्णालय- समता कॉलनी- मध्यवर्ती इमारत यामार्गे फिरुन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅलीची सांगता झाली. रॅली दरम्यान वाहन ताफा शहरातील मुख्य वस्त्या- चौक येथे थांबत होता. या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक ध्वनीक्षेपकावरुन जनतेस संबोधीत करुन लॉकडाउन काळातील नियम- बंधने, दंडात्मक कारवाई, सोशल डिस्टन्सींग, यात जनतेची भुमीका आणि जबाबदारी या विषयी माहिती दिली. तसेच लॉकडाऊनचे नियम पाळून जनतेने पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.