उस्मानाबाद - उस्मानाबादची लेक देशातील सर्वात कमी वयाची महिला आयपीएस होण्याचा मान मिळणार ( Youngest IPS in India ) आहे. जिल्ह्यातील भातागळी, ता.लोहारा येथील नितीशा संजय जगताप हिने अवघ्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत देशातून १९९ वी रँक मिळवत मोठे यश संपादन ( First women youngest IPS in india ) केले होते. सध्या तिची ट्रेनिंग सुरू झाली असून, लवकरचं ती आपल्याला आयपीएस म्हणून कर्तव्य बजावताना दिसणार आहे.
पदवीच्या दुसऱ्या वर्षापासूनचं यूपीएससीच्या तयारीला -
नितीशाचे आज देशभरात कौतुक होत आहे, पण तिचा हा प्रवास सोपा नव्हता. नितीशा लहानपणापासूनच अभ्यासू, हुशार आणि जिद्दी होती. तिचे शालेय शिक्षण हे पुण्यात झाले. पुढे पदवीचे शिक्षणासाठी तिने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. पदवीच्या दुसऱ्या वर्षापासूनचं तिने यूपीएससीसाठी तयारी सुरू केली होती. त्यासाठी तिने पुण्यातीलचं स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या अकॅडमीमध्ये प्रवेश घेत तयारीला लागली.
देशात १९९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण -
समाजातल्या गरजू लोकांना मदत करण्याच्या इच्छेतून प्रशासकीय सेवेसाठी तिने प्रयत्न सुरू केले. सप्टेंबर २०२१ मध्ये नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये ती देशात १९९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. आता २६ मार्चपासून हैदराबाद नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये तिचे प्रशिक्षण सुरू होणार आहे.
नितीशाचे यश उस्मानाबादकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद -
नितीशाचे हे यश उस्मानाबादकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद असून उस्मानाबादच्या युवकांमध्ये मोठी गुणवत्ता असल्याचे पुन्हा या निमित्ताने सिद्ध झाले आहे. इथल्या युवकांना योग्य संधी मिळाली तर केवळ स्वतःचेच नाही तर जिल्ह्याचे, देशाचे नाव ते मोठे करू शकतात. तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी देखील तिच्या यशाचे कौतुक करत तिला पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.