सोलापूर - उच्च शिक्षण घेऊन ही सरकारी नोकरीसाठी लाखो रुपये द्यायचे कुठून, या विवंचनेत असलेल्या एका तरुणाने आगळा वेगळा व्यवसाय सुरू केला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील वैभव पाटील या तरुणाने फाटक्या चलनी नोटा बदलून देण्याचा व्यवसाय सुरू केला, आणि महिन्याकाठी 25 ते 30 हजार रुपये कमाई सुरू केली. या तरुणाच्या आगळ्यावेगळ्या व्यवसायावर ईटीव्ही भारतचा हा स्पेशल रिपोर्ट.
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परांडा तालुक्यातील वाकडी गावचा वैभव पाटील हा तरुण. वैभव पाटील याचे शिक्षण हे bsc बी एड. पर्यत झाले आहे. शाळेवर नोकरीसाठी गेले तर १५ ते २० लाख रुपयांची मागणी संस्थाचालकांकडून होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर संस्थाचालकांना पैसे द्यायचे कुठून हा प्रश्न वैभव पाटील यांना सतावत होता. वैभव यांच्या घरी वडिलोपार्जित दहा एकर जमीन आहे. मात्र, ही जमीन देखील कोरडवाहू आहे . कोरडवाहू जमीन असल्यामुळे शेतीतील उत्पन्नाला मर्यादा येतात. त्यातही उस्मानाबाद सारख्या जिल्ह्यातील असल्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतातून मिळणार काय? या सर्व प्रश्नावर मार्ग शोधत वैभव पाटील यांनी नाविन्यपूर्ण व्यवसायाला सुरुवात केली. हा व्यवसाय म्हणजे चलनातील फाटलेल्या नोटा बदलून द्यायचा.
उंदराने कुरतडलेल्या, कपडे धुताना खिशात चुरगळलेल्या, अर्धवट जळालेल्या, रंग खराब झालेल्या, ग्राहकांकडे असलेल्या फाटक्या नोटांचे करायचं काय?, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. मग ते लोक वैभवकडे येतात आणि फाटक्या नोटा बदलून घेतात. वैभव पाटील हे देखील सर्व्हिस चार्ज म्हणून काही रक्कम घेतात आणि फाटक्या नोटा बदलून देतात.
वास्तविक कोणत्याही बँकेत गेले तर फाटक्या नोटा किंवा रंगलेल्या नोटा या बदलून मिळतात. मात्र, ग्रामीण भागांमध्ये बँकांची असलेली कमतरता, अनेकांकडे बँकेत जाऊन नोटा बदलून घेण्यासाठी नसलेला वेळ आणि दहा रुपये शंभर रुपये पर्यंत च्या नोटेसाठी बँकेत जायचे कशाला या सर्व गोष्टीमुळे फाटक्या नोटा असलेले लोक वैभव कडूनच नोटा बदलून घेतात. या नोटा बदलून देत असताना सर्विस चार्ज म्हणून वैभव हा काही ठराविक रक्कम घेतो आणि नोटा बदलून देतो.
हा व्यवसाय करत असताना वैभव त्याच्या गावापासून 100 किलोमीटरच्या परिसरात असलेल्या मोठ्या आठवडी बाजारात जातो आणि आठवडी बाजारात फिरून फाटलेल्या नोटा गोळा करतो. हा व्यवसाय करत असताना व्यवसायाची जाहिरात ही वैभवने कल्पक पद्धतीने केली आहे. डोक्यावर टोपी आणि खिशामध्ये पाटी .... डोक्यावरील टोपी वर आणि खिश्यातील पाटीवर फाटक्या नोटा बदलून मिळतील असे लिहून टोपी डोक्यावर आणि पाटी खिश्यात ठेवून वैभव हा जाहिरात करतो.
वैभव चे वडील देखील हाच व्यवसाय करतात. वडिलांचा व्यवसाय चांगला आहे आणि यातच आपण पुढे जावे असे ठरवून वैभवने हा नोटा बदलून द्यायचा व्यवसाय सुरू केला आहे. वैभवचा हा नावीन्यपूर्ण व्यवसाय राज्यातील तरुणांसाठी नक्कीच आदर्शवत असा आहे.