उस्मानाबाद - पावसाअभावी जिल्ह्यातील धरणे कोरडीठाक आहेत. त्यामुळे चारा छावण्या 31 ऑगस्टपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाला उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाने केराची टोपली दाखवत चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या या चारा छावण्यांमध्ये जवळपास 19 हजारपेक्षा जास्त जनावरे आहेत. पावसाअभावी चारा उगवला नाही, त्यामुळे चारा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या 70 पैकी 15 चारा छावण्या सुरू आहेत. जिल्ह्यातील 17 मध्यम प्रकल्पात 0 टक्के पाणीसाठा, तर 205 लघु प्रकल्पात 1 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जुलैअखेर 159 गावात 211 टँकर सुरू होते. चारा आणि पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावे लागत आहे. तरीही प्रशासनाने चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे उस्मानाबादचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात प्रशासनाला सरकारच्या आदेशाची आठवण करुन दिली. मात्र, त्याचा फारसा फरक पडलेला दिसत नाही.